नारळ... Marathi Story | कथा
हक्कसोडपत्रावर सह्या केल्यावर अंबीने पदराने डोळे पुसले. दोन एकराच्या तुकड्यातली थोडीशी जमीन विकण्यावाचून शांतारामकडे दुसरा काही पर्याय नव्हता. अंबीचं सासर संपन्न होतं, पण तिचा भाऊ भयंकर गरिबीत होता. भाऊ दांडेकराला जमीन विकणे गरजेचे होते. हक्कसोडपत्रावर अंबीची सही हवीच, ती नसल्याशिवाय जमीन घेणार नाही, असा भाऊचा कठोर नियम होता.
आता केवळ विश्वंभराच्या डोंगराशेजारी असलेला छोटासा तुकडा शांतारामकडे शिल्लक होता. अंबीला प्रॉपर्टीमधला वाटा गेल्याचं दुःख नव्हतं, पण माहेरच्या नात्यातला शेवटचा धागा तुटल्यासारखा वाटत होतं.
शांतारामची बायको पुढे आली, तिने अंबीला समजावलं, "अंबीवन्सं हक्कसोड झाली म्हणून नाती तुटत नाहीत गं. तुम्ही असं मनाला लावून घेऊ नका. मी यांच्याशी बोलले आहे. तलावाच्या जवळ असलेली दोन नारळाची झाडं तुमचीच. जे काही नारळ येतील, ते तुम्ही वर्षभर हक्काने घ्या. आम्ही त्यातले नारळ पूजेला वापरणार नाही."
शिवाय, ती पुढे म्हणाली, "वाडी शेती तुमच्या भावाची आहेच. कधीही या, मुठभर सुपारी किंवा दोन पायली तांदूळ घ्यायला आम्हाला काहीच जड नाही." अंबीने डोळे पुसले आणि अनेक वर्षं ती दोन नारळांच्या झाडांवरून नारळ घ्यायची.
काळ बदलत गेला. अंबीच्या सासरच्या संपन्न घराला दृष्ट लागली. तिचं सासरचं घर सुद्धा कमी होत गेलं. तिचे सासरे आणि नंतर नवरा दोघेही गेले. अंबीने दोन मुलींना सांभाळत घर चालवलं. शांतारामने मात्र कधीच त्या नारळांच्या झाडांना हात लावला नाही.
जेव्हा कधी मारत्या (मजूर) वाडीवरून परतताना हातात नारळ घेऊन यायचा, तेव्हा शांताराम विचारायचा, "कुठले नारळ रे?" मारत्या म्हणायचा, "दादा, तलावाच्या बाजूला असलेले नारळ, पाटील मास्तरांच्या वाडीशेजारचे."
मग शांताराम म्हणायचा, "रांडेच्या! ते नारळ माझ्या बहिणीला दिले आहेत. तिला नारळ देऊन ये आणि सांग की नारळ तयार झालेत, पाडून घे."
काळ पुढे जात होता. अंबी गेली, पण तिच्या मुलींना शांतारामने नारळाचे हक्क दिले होते. मोठी माई आणि धाकटी ताई, दोघीही नारळ घेऊ लागल्या. शांतारामला भाच्यांसाठी आनंद होत असे. ताई गेली तरी ऋणानुबंध घट्ट होते. नारळ हा फक्त एक निमित्तमात्र होता.
मधल्या काळात अनेक गोष्टी घडल्या. माई आणि ताई शहरात गेल्या, शांतारामही गेला. त्याचा मुलगा वाडी बघायला लागला. वादळात राहिलेले नारळाचे पंचवीस झाडं आणि त्यांच्यासोबत हक्काचे दोन नारळाचे झाडंही गेलं. ऋणानुबंध हळूहळू कमी होत गेले, रक्ताच्या नात्यात परकेपणा आला. जुने करार माणसांबरोबरच गेले.
माई आणि ताई आता मुंबईत निवृत्तीनंतर शांततेत होत्या. एका दिवशी दोघींना एक पत्र आणि दोन चेक आले. चेक पाच हजार रुपयांचे होते आणि पत्रात लिहिले होते:
"नमस्कार,
मी निलेश, शांताराम जोश्यांचा नातू. म्हणजे तुमचा लांबचा भाचा. बाबांना आजोबांच्या मृत्यूनंतर वाडी सांभाळता आली नाही. ती मी आता सांभाळतोय. जुनी कागदपत्रे तपासत असताना आजोबांनी अंबी आजीला दोन नारळाची झाडं उत्पन्नासह दिल्याचा उल्लेख मिळाला. काही काळ ती वहिवाट सुरु होती, पण नंतर वादळाने झाडं गेली आणि परंपरा तुटली.
आपलं ओळख नाही, पण मी नव्या वाडीमध्ये दोन कलमी नारळाची झाडं लावली आहेत. तुम्ही इथे येऊ शकत नसल्यामुळे, मी त्यांचे नारळ उतरवून दरवर्षी पैसे पाठवत जाईन. माहेरची ओढ वाटली, तर कधीही या. झाडांना खतपाणी घालायला तरी या. खाली माझा नंबर आहे. पत्र आणि चेक मिळाल्यावर नक्की फोन करा." निलेश.
दोघींनी ते पत्र ओंजळीत घेतलं आणि अश्रूभरल्या अंतःकरणानं ते उराशी कवटाळलं. ज्यांनी करार केले, ज्यांनी नाती घट्ट ठेवली, ती सगळी मंडळी आता या जगात नव्हती, पण परंपरेचा प्रवाह मात्र अजूनही अखंडित होता.
--
सूनंदा मधूकर चितळे पूणे यांनी हा लेख पाठवला त्या वाचनप्रेमी कट्टा च्या सदस्य आहेत.